
मोलमजुरी करणार्या महिलेने सहा एकरावर फुलवली वनशेती
खेड : सह्याद्रीच्या डोंगर-दर्यांमध्ये हापूस आंबा – काजूची झाडे, सागवान, वनौषधी झाडांची लागवड राजेश्री यादव यांनी केली आहे. एका स्त्रीने मेहनतीने वनशेती उभारली आहे. खेड तालुक्यातील आंबवली येथे वास्तव्यास असलेल्या व सुरवातीच्या काळात मोलमजुरी करणार्या राजेश्री यादव यांनी ही किमया करून दाखवली आहे. डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन शंभर टक्के झाडे जगवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. कोकणातील ओसाड – उजाड रानामध्ये निर्माण केलेल्या आंबा – काजूसह सागवानासह वनौषधी झाडांच्या बागा निर्माण करून यादव यांनी स्वतःच्या जमिनीतच रोजगार निर्मितीचा नवा मार्ग निर्माण केला आहे. डोंगर-दर्यात वसलेल्या आंबवली या गावात वनशेती करून राजेश्री यादव या महिलेने कोकणातील तरूण-तरुणींसाठी एक नवा अनोखा आदर्श घालून दिला आहे. यादव यांचे कुटुंब हे एक सामान्य घरातील आहे. पती आणि एकुलती एक मुलगी असा त्यांचा छोटासा परिवार आहे. पूर्वी त्या आंबवली गावामध्ये मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असत. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी वेगळे करून दाखवले पाहिजे, असा त्यांचा नेहमी प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी खडतर परिश्रम घेण्याची भूमिका बजावली. ओसाड माळरानावर झाडांची लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केला. सुमारे 35 ते 40 एकर जमीन आंबवली आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. ही जमीन डोंगराळ आणि खडकाळ असून आत्मविश्वासाच्या जोरावर यातील पाच ते सहा एकर जमिनीत वनशेती फुलवली
आहे.




