
दाभिळ येथे चिरेखाणीचा भाग घरावर कोसळून नुकसान; दुचाकीसह चारचाकी मातीच्या ढिगाऱ्याखाली
खेड : तालुक्यातील दाभिळ नजीकच्या चिरेखाणी लगत असलेल्या संतोष धारू चव्हाण यांच्या घरालगत असलेला चिरखाणीचा काही भाग चव्हाण यांच्या घरावर कोसळला. यामुळे चव्हाण यांचे घर त्या दरडीखाली गाडले गेले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील सर्व साहित्यासह एक दुचाकी आणि एक चार चाकी गाडीचे नुकसान झाले आहे. ही दुघर्टना घडल्यानंतर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तत्काळ चव्हाण कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. संतोष चव्हाण यांच्यासह या ठिकाणी सहा जण राहत होते. या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने पंचनामा सुरू असल्यामुळे नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.