
दापोली-वळणे येथे एसटी आणि बोलेरो यांच्यात अपघात; बोलेरोचालक जखमी
दापोली : तालुक्यामधील वळणे येथे एसटी आणि बोलेरो यांच्यात झालेल्या अपघातात बोलेरो चालक जखमी झाला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र वायकर (राहणार जालगाव) हे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप घेऊन दापोलीकडून दाभोळकडे जात होते. त्यावेळी बळीराम खानविलकर हे दापोली आगारातील बसचालक आपल्या ताब्यातील दाभोळ- दापोली बस घेऊन दापोलीकडे येत होते. गाडी वळणे येथे आली असता वायकर यांनी अति वेगाने गाडी चालवत एसटी बसच्या ड्रायव्हरकडील बाजूस जोरदार ठोकर दिली. या अपघातामध्ये एसटी बसचे आणि बोलेरो पिकअप गाडीचे नुकसान झाले आहे . तसेच बोलेरो चालक धर्मेंद्र वायकर यांना दुखापत झाली आहे. दापोली आगारातील बस चालक खानविलकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत.