
चौपदरीकरण कामाचे तीनतेरा; मुसळधार पावसात चिपळूणवासीयांना फटका
चिपळूण : चौपदरीकरण करणार्या ठेकेदाराने गटार व नाल्याचे योग्य नियोजन न केल्याने यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावरून एकप्रकारे नदीच वाहू लागली. सोमवारी या पावसामुळे शहरातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दाणादाण उडवून दिली. डोंगरमाथ्यावरुन येणार्या पाण्याला वाट न मिळाल्याने सर्व पाणी महामार्गावरून वाहू लागले. विशेषकरून शिवाजीनगर ते डीबीजे महाविद्यालयापर्यंतचा रस्ता पाण्याने प्रवाहीत झाला होता. यामुळे महामार्गावरील वाहतक विस्कळीत झाली. सायंकाळी ठेकेदाराने तत्काळ जेसीबी, पोकलेनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी आले आहे अशा ठिक़ाणच्या मोर्या, नाले सफाईचा प्रयत्न केला. तरीही जोरदारपणे महामार्गावरून पाणी वाहत होते. पूर्वीचे असलेले नाले, पर्हे महामार्ग कामांतर्गत बुजवून नव्या नियोजनात चुकीच्या पद्धतीने केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा आणि प्रवाह पूर्णपणे अडून पाणी रस्त्यावरून वाहत होते.
शहरातील लोटिस्मा वाचनालय परिसर, आईस फॅक्टरी परिसर, मुरादपूर गणेश मंदिर परिसर या सखल भागात पाणी तुंबले होते. रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता पाण्यामुळे बंद झाला होता. दुसरीकडे शिव व वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत देखील लक्षणीय वाढ झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिव व वाशिष्ठी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सोमवारी शहरात नगर परिषदेच्यावतीने नागरिकांना ध्वनीक्षेपकामार्फत सूचना देण्यात येत होती.