
रत्नागिरीत दोन बंगले फोडून लाखोंचा ऐवज लांबवला
रत्नागिरी : रत्नागिरीतील डॉक्टरांचा बंगला फोडून रोख रकमेसह दागिने लांबवल्याची घटना शहरातील मारुतीमंदिरनजीकच्या आनंदनगरमध्ये घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरीतील डॉक्टर मिलिंद कुलकर्णी हे शनिवारी सायंकाळी गणेशोत्सवासाठी धामणसे या गावी कुटुंबियांसमवेत गेले होते. सोमवारी सकाळी ते रत्नागिरीत आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाजवळील स्लायडिंगची खिडकी उचकटून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील दोन कपाटे फोडली. यातील एका कपाटामधील रोख रक्कम 27 हजार रुपये, पाव किलो वजनाचा चांदीचा तांब्या, सोन्याची अंगठी, कानातला जोड असा मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवारी सकाळी कुलकर्णी दाम्पत्य घरी आले असता त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर ही बाब तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना याची माहिती मिळताच ते कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
रत्नागिरी शहराप्रमाणेच पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्येही चोरट्यांनी बंगला फोडून रोकड लांबवल्याचा प्रकार पुढे आला आहे.