
शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्यास शिक्षक संघटनांचा विरोध
रत्नागिरी : शासनामार्फत शिक्षकांना वर्गात स्वतःचा फोटो लावण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्याला शिक्षकांचा तीव्र विरोध आहे. त्यापेक्षा शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. फोटो लावण्यापेक्षा शिक्षकांची रिक्त पदे प्राधान्याने भरावीत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, विजयकुमार पंडित, सुजित साळवी, प्रभाकर खानविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, एका शिक्षकाकडे दोन ते तीन वर्गांची जबाबदारी दिली जाते. काही ठिकाणी इयत्ता 1 ते 5 शाळेचा मुख्याध्यापक पदाचा पूर्ण शाळेचा पदभार सांभाळावा लागतो. सततची प्रशिक्षणे व अशैक्षणिक कामे यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. राज्यभरात अठरा हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 90 टक्के शाळांत स्वतंत्र मुख्याध्यापक नाही. वर्ग अध्यापनासोबत मुख्याध्यापक प्रभार आणि कागदपत्रांच्या जबाबदारीमुळे मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहणारे अनेक ज्येष्ठ शिक्षक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.