
लोटेतील ग्रामस्थांनी रोखले पाईपलाईनचे काम
खेड : लोटे विस्तारित औद्योगिक वसाहत परिसरात ग्रामस्थांनी परिसरामध्ये उद्योग येतील, परिसराचा विकास होईल, बेरोजगारांना रोजगार मिळेल या आशेवर व बदली जमीन मिळेल या आश्वासनावर विश्वास ठेवून औद्योगिक वसाहत व पाईपलाईनसाठी जमिनी दिल्या. दहा ग्रामस्थांकडून एकाच दिवशी एमआयडीसीने हक्क सोडपत्र करून घेतले व बदली जमीन देण्याचे कबूल केले. मात्र, सात वर्षे उलटूनही अद्याप जमीन मालकांना बदली जमिनीचा सातबारा अथवा कोणतेही कागदपत्र देण्यात आलेले नाहीत. त्यातच आता ग्रामस्थांच्या जमिनीतून पाईपलाईनचे काम सुरू केले. परिणामी संतप्त ग्रामस्थांनी हे काम रोखून
धरले. विस्तारित लोटे औद्योगिक वसाहतीसाठी खासगी जागेमधून पाईपलाईन खोदण्यात येत असली तरी औद्योगिक विकास महामंडळाने त्या जागेतील जमीन मालकांना अदलाबदल पद्धतीमध्ये जमीन देण्याची कबुली दिली होती. मात्र, तसे न झाल्याने ग्रामस्थांनी हे काम रोखून धरले आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकार्यांसोबत पत्रव्यवहार व चर्चा बैठका सुरू असतानाही महामंडळाच्या अधिकार्यांनी पोलीस संरक्षणामध्ये काम पूर्ण करण्याचा घाट घातला. लोटे पोलीस दूरक्षेत्रावर या ग्रामस्थांना बोलावणे आले व त्यांना याबाबत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्यासमोर या विषयातील सर्व पुरावे कागदपत्रांसह सादर केले व शेतकर्यांची बाजू मांडली.