माखजन बाजारपेठेत शिरू लागले पुराचे पाणी
आरवली : माखजन, आरवली परिसरात दमदार पाऊस पडल्याने तसेच गडनदी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने गडनदीला पूर आला आहे. यामुळे माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून आकाश ढगांनी भरून आले. १२ वाजता पावसाने जोर धरला. राजीवली गडनदी धरण पाणलोट क्षेत्र आणि आरवली कोंडीवरे परिसरात मुसळधार पावसामुळे गडनदीच्या पाण्याची पातळी जोराने वाढू लागली. यामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरू लागल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पुराचे पाणी बाजारात शिरत असल्याचे समजताच व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानाकडे धाव घेतली.