पहिल्याच पावसात शीळ-चिखलगाव रस्ता पाण्याखाली; ग्रामस्थांनी वळसा मारून गाठले घर
राजापूर : पहिल्याच पावसात शीळ-चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या दशक्रोशीतील विद्यार्थी व जनतेची मोठी गैरसोय झाली आहे. अर्जुना नदीच्या पुराचे पाणी या मार्गावर आल्याने सोमवारी राजापूर शहरात आलेल्या विद्यार्थी, कर्मचारी आणि जनतेला दहा ते बारा किलोमिटर वळसा घालून घर गाठावे लागले. राजापूर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. विशेषत: पाचल पूर्व भागात झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना नदीला पूर आला आहे. त्यामुळे अर्जुना नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी शिळ-चिखलगाव मार्गावर अर्जुनेच्या पुराचे पाणी येऊन हा मार्ग बंद झाला आहे. अर्जुना नदीकिनारी भागातून जाणाऱ्या शिळ-चिखलगाव मार्गावर पुराचे पाणी येत असल्याने या मार्गाची उंची वाढवावी, अशी जनतेची मागणी आहे. मात्र या मागणीकडे कानाडोळा होत आहे. त्यामुळे दरवर्षी रस्ता बंद होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.