एकनाथराव, शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे या : आ. भास्कर जाधवांची आर्द साद
मुंबई : एकनाथराव शिवसेना संपविण्याचा भाजपचा 25 वर्षांचा इतिहास आहे. सेना संपवणं हा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात, आम्हाला आनंद आहे, पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे या. महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, अशी आर्त साद शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना सभागृहात घातली.
एकनाथ शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषण करायला भास्कर जाधव उभे राहिले. मी विचलित आहे. मी अस्वस्थ आहे… एकनाथ शिंदे आजही सभागृहात सांगतात की मी शिवसेनेचा आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आजही सांगतात की आनंद दिघेंचा वारसदार आहे. मी सुद्धा ते मान्य करतो. मला एकनाथ शिंदेंना सांगायचंय, तुमच्यावर मोठी जबाबदारी आलीय, तुम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेता. आपली एवढी उठबस नाही, जास्त भेट नाही.. तरी देखील तुमची लोकांना मदत करण्याची जी पद्धत बघितली ती भावली. कोकणातल्या महापुरात तुम्ही चांगली मदत केली हे मान्य करतो. लोकांसाठी धावून जाता ही वस्तुस्थिती आहे. आपलं काम मी जवळून पाहिलंय. या शिवसेनेत एका बाजूला 40 शिलेदार तुमच्यासोबत आहेत, तर दुसर्या बाजूला उरलेले शिवसैनिक शिवसेना वाचवायला उभे आहेत. कोण कुणावर घाव घालणार आहे.. कोण कुणाला घायाळ करणार आहे आणि कोण कुणाला धारातिर्थी पाडणार आहे, याचा विचार करा. थांबायचं कुठे हे ज्याला कळतं तोच खरा यशश्वी नेता. तुमच्या मनातले अनेक दुःख असतील ते मांडा तुम्ही.. पण महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे, असे आ. जाधव यावेळी म्हणाले.