
लोटेत मुसळधार पावसामुळे एमआयडीसीचा रस्ता पाण्याखाली
खेड : गेले चार दिवस झालेल्या पावसामुळे लोटे -परशुराम औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ता पाण्याखाली गेला असून, वाहतुकीची गैरसोय झाली आहे. गेले अनेक दिवस हुलकावणी देणार्या वरूणराजाने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
उन्हाच्या तीव्र झळांनी कासावीस झालेल्या लोकांना वातावरणात गारव्याने दिलासा दिला आहे. मात्र त्याचवेळी लोटे -परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ता पाण्याखाली गेल्याने अनेक वाहनचालक व पादचार्यांना या मार्गावरून ये -जा करताना कमालीची कसरत करावी लागत आहे. मुंबई – गोवा महामार्गालगत आवाशी-गुणदे फाट्यानजीक असणार्या एमको पेस्टिसाईड कंपनीसमोरून जाणार्या एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यावर सीईटीपीसमोर व एसआर ड्रग्स कंपनीजवळच्या मार्गावरील रस्ता पाण्याखाली गेला आहे.
या ठिकाणी पूर्वेकडील बाजूस युएस व्हिटॅमिन कंपनीचा सोलर प्लान्ट व बॉयलर हाऊस असून, लगतच अन्य एका कंपनीचे गोडाऊन आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडील बाजूस महामार्ग लागून आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने हे पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे. मागील दोन वर्षांपासून याकडे एमआयडीसीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असूनही परिस्थिती जैसे थे आहे. अजून पावसाळ्याचे काही महिने शिल्लक असून, आतातरी एमआयडीसीने ही समस्या दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.