फरारे जेटी ठरतेय वाळू माफियांसाठी सोयीची
दापोली : तालुक्यातील फरारे जेटीवर उतरल्या जाणार्या वाळूची तस्करी ही भर दिवसा उन्हवरे-वाकवली मार्गावरून होत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर वाळू तस्करीला अभय कुणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील फरारे येथे गुहागर ते दापोली असा बोटीने प्रवास करण्यासाठी जेटी बांधण्यात आली आहे. या जेटीचे अद्याप लोकार्पण देखील झाले नाही. असे असताना या जेटीचा ताबा वाळू तस्करांनी घेतला असून या जेटीवर भर दिवसा वाळू उतरली जात आहे. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरू असून वाकवली ते उन्हवरे या परिसरातील डंपर भर दिवसा या वाळूची वाहतूक करत आहेत. ही बाब येथील मंडल अधिकारी सुधीर पार्दूले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून याबाबत आपण माहिती घेऊन कारवाई करू, असे सांगितले जात आहे. दि. 30 जून रोजी उन्हवरे मार्गावरून वाकवलीकडे जाणारे वाळूचे डंपर अनेक नागरिकांनी पाहिले आहेत. याची माहिती महसूल विभागाला देखील देण्यात आली आहे. मात्र तरी देखील कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महसूल विभाग या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास हात आखडते का घेत आहे? असा सवाल देखील या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.