पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडून 17 कोटी 28 लाख रुपयांचा निधी
रत्नागिरी : खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 17 कोटी 28 लाख रुपये निधी केला मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजिनामा देण्यापूर्वी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अनेक विकास कामांना मंजुरी दिली. यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही जिल्ह्यातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. यामध्ये प्रामुख्याने संगमेश्वर तालुक्यातील प्रसिध्द मार्लेश्वर देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी साडेचार कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्या खालोखाल महिपतगड परिसराच्या सुशोभिकरणासाठी साडेतीन कोटीचा निधी दिलरा आहे.
चिपळूण मतदार संघातील टेरव येथील प्रसिध्द श्री जयभवानी वाघजाई मंदिरातील सुशोभिकरणासाठी 78 लाख 12 हजारचा निधी दिला. चिपळूण मतदार संघातील तीन कामासाठी जवळपास पावणेनऊ कोटीचा निधी आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करुन दिला आहे.
राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण गुरववाडी येथील पुरात महाकाली मंदिराच्या परिसर विकासासाठी तीन कोटींचा निधी देण्यात आला आहे. नाखरे -पावस येथील परिसर विकासासाठी दीड कोटीचा निधी देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील तालुक्यांना 17 कोटी 28 लाखाचा निधी दिल्याबद्दल खा. विनायक राऊत यांनी माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे विशेष आभार मानले.