गुहागर-गडगोबा देवस्थान परिसर बनलाय अपघातप्रवण क्षेत्र
गुहागर : शृंगारतळी-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे रस्त्याच्या मध्यवर्ती असलेल्या गडगोबा देवस्थान परिसर अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. रस्त्याच्या कडेने डोंगराची माती रस्त्यावर येऊन रस्ता निसरडा झाला असून संपूर्ण एकेरी मार्ग धोकादायक बनला आहे. येथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरु झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे दिसून येत असून वाहनचालकांनी संताप व्यक्त केला
आहे. गडगोबा हे देवस्थान पाटपन्हाळे गावचे श्रद्धास्थान आहे. रस्त्याच्या मध्यवर्ती असल्याने ते रुंदीकरणात हटवावे लागणार होते. अशावेळी येथील ग्रामस्थांनी श्रध्देचा विषय करीत ठेकेदाराला विनंती करून हे देवस्थान वाचवून पर्यायी मार्ग काढावा असे सूचित केले होते. एका बाजूने डोंगर असल्याने पावसाळ्यात येथे डोंगराची माती रस्त्यावर येऊन रस्ता निसरडा होतो. त्यातच संरक्षक भिंतीचे काम ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात घेतल्याने रस्त्याची पूर्णतः एक बाजू कामामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकच मार्गिका वाहतुकीला असल्याने समोरुन येणारी वाहने दिसत नाहीत. त्यातच रस्ता निसरडा झाल्याने हा भाग अपघातप्रवण झाला
आहे.