
यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ, शहरी भागात 9 टक्के, ग्रामीण भागात 7 टक्के दरवाढ प्रस्तावित
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने वार्षिक चालू बाजारमूल्याचे (रेडीरेकनर) नवीन दर आहे तेच ठेवण्याबाबत निर्णय न घेतल्याने यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ केली जाणार आहे. ही दरवाढीची १ एप्रिलपासून किंवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून शहरी भागात नऊ टक्के, नगरपरिषद क्षेत्रात चार टक्के, प्रभाव क्षेत्रात साडेचार टक्के आणि ग्रामीण भागात सात टक्के अशी दरवाढ प्रस्तावित केली आहे.दरवर्षी १ एप्रिलपासून रेडीरेकरनचे नवीन दर जाहीर केले जातात. गेल्या वर्षी कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. रेडीरेकनरचे दर निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यात आल्यावर राज्य सरकारकडून त्यावर निर्णय घेण्यात येतो आणि हा निर्णय नोंदणी महानिरीक्षक जाहीर करतात.यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारकडून हस्तक्षेप करण्यात येणार नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळांच्या बैठकीतही रेडीरेकनरच्या दराबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यंदा रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com