कोयनेचे अवजल वाशिष्ठी नदीत सोडून चिपळूणच्या पूरस्थितीचा केला अभ्यास
चिपळूण : पुराचा अभ्यास करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार गुरूवारी (दि.30) कोयना वीज प्रकल्पाचे अवजल वाशिष्ठी नदीपात्रात सोडले. यानंतर वाशिष्ठी नदीची पाणी पातळी किती होते, हे पाणी चिपळूणमध्ये किती वेळेत पोहोचते, पाऊस आणि भरतीच्यावेळी नदीच्या पाणी पातळीत किती वाढ दिसते याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नदीपात्रात तिसर्या टप्प्यातून सुमारे साडेआठ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते व वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या नोंदी घेण्यात येत होत्या. सांख्यिकी माहितीनंतर निष्कर्ष काढला जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. शुक्रवारीदेखील ‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या माध्यमातून या नोंदी घेतल्या गेल्या. गुरूवारी चिपळूणमध्ये महाजनको, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन, पाटबंधारे विभाग, पुणे येथील सीडब्ल्यूपीआरएस तसेच अभ्यास गट समिती तर चिपळूण न.प.च्यावतीने कोयना अवजल वाशिष्ठी नदीपात्रात सोडून प्रात्यक्षिक घेण्यात आले. सकाळी 11 वा. कोयनेच्या तिसर्या टप्प्यातून वीजनिर्मिती सुरू होऊन कॅनॉलला अवजल सोडण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत हे पाणी व वीजनिर्मिती सुरूच होती. साधारणपणे साडेआठ हजार क्युसेक पाणी वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात आले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या नोंदी घेण्यात आल्या. यासाठी महाजनकोचे महाव्यवस्थापक चोपडा, सहाय्यक व्यवस्थापक कुंभार, कोळकेवाडी धरण व्यवस्थापनचे मुख्य अभियंता श्री. पोतदार, सीडब्ल्यूपीआरएसचे शास्त्रज्ञ डॉ. कुंजीर व त्यांची टीम, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता खोत, कोळकेवाडी धरणाचे उपविभागीय अभियंता डी. डी. गायकवाड, अभ्यास गट समितीचे संजीव अणेराव, सतीश कदम, चिपळूण न.प.चे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे व अन्य अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत होते व वाशिष्ठी नदीपात्रावर लक्ष ठेवण्यात येत होते. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या नोंदी घेण्यात आल्या. बहादूरशेख येथे तर वॉटर गेज मशिन बसविण्यात आली आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून सांख्यिकी मांडण्यात येणार आहे व त्यातून येणारे अनुमान अभ्यास गट समितीला देण्यात येणार आहे. यानंतर अभ्यास गटाच्या पुढील बैठकीत या बाबत विचारविनिमय होईल, निष्कर्ष काढला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.