“एका दिवसात रेशन घेऊन जा”; दुकानदारांच्या फतव्याने नागरिक आक्रमक, पोलिसांना बोलवण्याची वेळ
लांजा : एका दिवसात रेशन घेऊन जा, अन्यथा उद्या मिळणार नाही. या प्रशासन आणि रेशन दुकानदाराच्या फतव्याविरोधात शहरातील रेशन दुकानावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने तणावाचे वातारण निर्माण झाले. गुरुवार 30 जून आणि 1 जुलै सलग दोन दिवस हा प्रकार लांजा येथील रास्त दराचे धान्य रेशन दुकान क्र.3 या ठिकाणी घडला. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात नागरिकांना रेशन देण्यात आले. जून महिन्याचे रेशन दुकानदाराला उशिराने प्राप्त झाल्याने महिन्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांना रेशन मिळेल असा फतवा शहरातील रेशन दुकानदाराने काढला. यातच थम्ब मिळत नसल्याने रेशन घ्यायला येणार्या नागरिकांची नेहमीच तारांबळ उडत असते. अशातच नेटवर्क प्रॉब्लेममुळे मशीन ऑपरेट होत नसल्याने रेशन आजच घेऊन जा, उद्या मिळणार नाही असे सांगितल्याने ग्राहक संतप्त झाले. शहरातील रास्त दराचे धान्य दुकान क्र.3 यावर रोहिदासवाडी, पानगलेवाडी, डाफळेवाडी, तेलीवाडी, तीन कुंभारवाड्या तसेच देवराई, आगरवाडी या वाड्यांबरोबर धुंदरे, केळंबे येथील सुमारे 755 कार्डधारक आहेत. गेल्या महिन्यात रेशन नसल्याने गुरूवारी नागरिकांची रेशन घेण्यासाठी झुंबड उडाली.