
परशुराम घाटातून जाताय तर सावधान
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणार्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून यातील एक दगड एका वाहनाच्या काचेवर पडल्याने काच फुटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
गेले तीन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. तिनही दिवस पावसाची संततधार होती. यामुळे आता घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने या मातीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी परशुराम घाटात डोंगर कटाई झाली असल्याने ही माती भिजून दरड कोसळण्याचा धोका संभवत आहे. अनेक ठिकाणी घाटात रस्त्यावर डोंगर कटाईची माती आली आहे. त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. मुसळधार पाऊस न झाल्याने रस्त्यावरील माती अद्याप वाहून गेलेली नाही. त्यामुळे या चिखलातून लोकांना मार्ग काढावा लागत आहे.