रत्नागिरीत कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयातर्फे 30 जूनला कालिदास दिन कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदासांचा जन्मदिन (ता. ३० जून) म्हणजे आषाढ शुक्ल प्रतिपदेला आहे. यानिमित्त रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पां. वां. काणे उपकेंद्रात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संस्कृत भाषेला वाणी कालिदासाने दिली असे म्हटले जाते. भारतीय इतिहासाचा तो प्रतिनिधी कवी आहे. कालिदास दिन रामगिरीसारख्या पवित्रस्थळी जाऊन यक्षवेडे लोक कालिदासाला दिसलेल्या मेघाच्या पुनरागमनाच्या आशेने उत्कंठित झालेले आहेत. वेगवेगळया अनुभूतीतून त्याचे स्मरण, चिंतन, श्रवण केले जाते. कालिदास दिन कार्यक्रमात राष्ट्रकवी कालिदासाच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त ४ जुलै रोजी कालिदासकृतीमंधील काव्यसौंदर्य या विषयावर विश्वविद्यालयाच्या साहित्य विभागाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका प्रा. नंदा पुरी या ऑनलाईन व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानामधून कविशिरोमणी कालिदासाचे काव्यामृत जनसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. तरी सर्व रत्नागिरीवासीयांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पां. वा. काणे उपकेंद्रातर्फे करण्यात आले आहे.