दाभोळे येथे पाच जनावरांचा पेंड खाल्ल्यानंतर तडफडून मृत्यू
संगमेश्वर: तालुक्यातील दाभोळे बहुलवाडी येथील शेतकरी तुकाराम गंगाराम शिवगण यांच्या मालकीची पाच जनावरे वाड्यात पेंड खाल्यानंतर सोमवारी सायंकाळी तडफडून मृत पावली. या घटनेने शिवगण यांचे ऐन शेतीच्या हंगामात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तुकाराम शिवगण यांनी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास शेतातून नांगरकी करून बैलांना वाड्यात आणल्यानंतर सर्व जनावरांना पेंड घातली. त्यानंतर लगेचच साधारण पंधरा ते वीस मिनिटाच्या आत पाचही जनावरांचा शिवगण यांच्या डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेत दोन बैल, पाडा, एक गाय आणि पाडी अशी पाच जनावरे एकाचवेळी मृत पावली. सदर घटनेचा पंचनामा संबंधित यंत्रणेने केला असून पंचनामा अहवालात १ लाख २२ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम असल्याने नांगराचे बैल आणि अन्य जनावरे दगावल्याने तुकाराम शिवगण या शेतकऱ्यावर मोठा प्रसंग ओढवला आहे. या मृत जनावरांचा विमा उतरवला गेला नसला तरी ऐन शेतीच्या हंगामात ही जनावरे दगावल्याने सदर शेतकऱ्यास आपद्ग्रस्त शेतकरी म्हणून शासकीय स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.