गोव्यात फणस लागवडीसाठी लांजातील तरुणाची धडपड
लांजातील तरूण शेतकरी मिथिलेश देसाई यांनी सपत्निक जॅकफ्रूट मिशन अंतर्गत फणस लागवड संदर्भात पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. गोव्यात फणस लागवडीबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.
ओल्ड गोवा, साऊथ गोवा, मापसा व मडगाव ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या दृष्टीने केरळ, मेघालय व महाराष्ट्राच्या धर्तीवर जँकफ्रूट मिशन अंतर्गत फणस लागवड वाढविण्यासंदर्भात मिथिलेश देसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. गोवा राज्य फणस लागवडीसाठी सकारात्मक व प्रयत्नशील असल्याचे तसेच इतर शेती बरोबर तिथे फणसाची लागवड उत्कृष्टरित्या केली जाऊ शकते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दरम्यान गोव्याचे कृषिमंत्र्यांशी जँकफ्रूट मिशन संदर्भात बैठक करून लागवडीचा मार्ग मोकळा करण्यात येईल, अशी प्राथमिक चर्चा यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सोबत भेटीवेळी झाली असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच देसाई यांनी त्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी येत्या काळात गोवा राज्यासोबत काम करेल आणि गोव्यात फणस लागवड सर्वत्र पसरेल, अशी अपेक्षा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.