खेड-दापोली मार्गाची दुरवस्था
खेड : राज्यमार्ग असलेल्या खेड-दापोली रस्त्याची मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसातच चाळण झाली आहे. या मार्गावर नारिंगी नदी किनारी मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची भीती वाहनचालकातून व्यक्त होत आहे.
खेड-दापोली या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याने या खड्यात चिखल पाणी साचून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चालकांना या भागात कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. खेड ते दापोली या मार्गावर सतत वर्दळ असते. मात्र तरी देखील या मार्गाच्या नारिंगी नदी किनाऱ्यावरील भागात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देताना दिसत नाही. येथे वीटांचे तुकडे टाकून डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले गेले असले तरी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर ही मलमपट्टी कुचकामी ठरली आहे. या मार्गावर पडलेले खड्डे तातडीने योग्य पद्धतीने भरून रस्ता वाहतुकीयोग्य बनवण्याची मागणी होत आहे.