पोलिस भरतीचा नियम पुन्हा बदलला! मैदानी परीक्षा झाल्यानंतर होणार लेखी परीक्षा

रत्नागिरी : राज्यात लवकरच होणार्‍या पोलिस भरती प्रक्रियेत यंदा मोठा बदल केला आहे. यापूर्वी या परीक्षेसाठी सुरुवातीला 100 गुणांची लेखी व त्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती. यंदा मैदानी चाचणी प्रथम घेणार असून, त्यात पात्र ठरणार्‍यांनाच लेखी परीक्षेला सामोरे जाता येईल. यंदा पोलिस भरतीमध्ये 50 गुणांची मैदानी चाचणी होणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच तीन चाचणी प्रकार आहेत. परंतु, त्यांच्या गुणांकनामध्ये बदल केला आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मी. धावणे 20 गुणांसाठी, 100 मी. धावणे व गोळाफेक प्रत्येकी 15 गुणांसाठी असणार आहे. तर, महिला उमेदवारांसाठी 800 मी. धावणे 20 गुणांसाठी आणि गोळाफेक व 100 मी. धावणे प्रत्येकी 15 गुणांसाठी असणार आहे.
शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. त्यानंतर एका जागेसाठी 10 या प्रमाणात उमेदवारांना पात्र करून लेखी परीक्षेसाठी बोलावणार आहे. लेखी परीक्षेत अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुध्दिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण, हे घटक असणार आहेत. लेखी परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी असतील व त्यासाठी 90 मिनिटे कालावधी असेल. लेखी परीक्षेतही किमान 40 टक्के गुण आवश्यक आहे. उमेदवाराची अंतिम निवड ही मैदानी चाचणीतील 50 गुण व लेखी परीक्षेतील 100 गुण अशा एकूण 150 गुणांतून होणार आहे. बारामती येथील सह्याद्री अ‍ॅकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी याबाबत माहिती दिली.
नवीन अधिनियमामध्ये पहिल्यांदाच मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत किमान गुणांची अट घातली आहे. तसेच, पोलिस खात्यातील गुन्ह्यांचे बदलते स्वरूप विचारात घेऊन दणकट शरीरयष्टीपेक्षाही जास्त बुध्दिमान उमेदवारांच्या निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या भरतीतही लेखी परीक्षेला 100 गुण दिले आहेत. फक्त सुरुवातीला 50 गुणांची मैदानी चाचणी घेणार, एवढाच बदल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button