
हज यात्रेसाठी पायी जाणाऱ्या केरळ येथील युवकाचे लांजात स्वागत
लांजा : सिहाब चित्तूर हा तरुण केरळ येथील मल्लपुरम येथून सौदी अरेबियामध्ये असलेल्या मुस्लीम धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान मक्का मदीना येथे पवित्र हज यात्रेसाठी पायी चालत निघालेला असताना त्याचे पायी प्रवासादरम्यान लांजा शहर व तालुक्यातील मुस्लीम समाज बांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
मुस्लीम धर्मामध्ये पवित्र हज यात्रेला अनन्यसाधारण महत्व असून दरवर्षी भारता बरोबर जगभरातून अनेक मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. मुस्लीम समाजातील प्रत्येकाने जीवनात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असे सांगितले जाते. मक्का मदीना येथे होणाऱ्या पवित्र हज यात्रेसाठी केरळ येथील सिहाब चित्तूर हा ३० वर्षीय तरुण नऊ हजार किलोमीटर इतके अंतर पायी चालत जाणार आहे.
हज यात्रेसाठी या तरुणाचा ३० मे रोजी पासून केरळ मधून प्रवास सुरु झाला असून केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, पाकिस्तान, अफगानिस्तान, इराण मार्गे तो सौदी अरेबियात दाखल होणार आहे. तेथून तो मक्का मदीना येथील सन २०२३ च्या हज यात्रेला उपस्थित राहणार आहे.