रत्नागिरी तालुक्यातील नारळ काढणाऱ्यांना मोफत विमा
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नारळ काढण्याचे काम करणाऱ्यांना (नारळ पाडपी) ५ लाखांचा अपघाती विमा देण्यासाठी स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने पुढाकार घेतला आहे. तसेच नारळ बागायतदारांना मोफत सेंद्रिय प्रमाणीकरण करून देण्याचे कामही कंपनीतर्फे केले जाणार आहे.
स्वराज्य ॲग्रो कंपनी नारळ झाडांचे व्यवस्थापन जानेवारी २०१५ पासून रत्नागिरी तालुक्यामध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहे. याच कंपनीमार्फत तालुक्यातील नारळ पाडपींना नारळ विकास मंडळामार्फत पाच लाखाचा विमा काढून देण्याचे काम केले जाणार आहे. नारळ पाडपींनी विमा काढण्यासाठी येत्या ३० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वराज्य ॲग्रो कंपनी नारळ झाडाचे आरोग्य सुधारणे, नारळ झाड मालकांचे उत्पन्न वाढविणे आणि स्थानिक पातळीवर किमान तीन हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती करणे या तीन मुद्द्यांवर मुख्यतः काम करत आहे: त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहरापासून ३५ किलोमीटरच्या परिसरातील नारळ बागायतदारांना मोफत सेंद्रिय प्रमाणीकरण करून दिले जाणार आहे. रसायनविरहित म्हणजेच सेंद्रिय उत्पादनाची जागतिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. परंतु सेंद्रिय प्रमाणीकरण करणे छोट्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही. अनेक शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेत असताना सेंद्रिय म्हणून त्यांना विकता येत नाही. कारण जागेचे सेंद्रिय प्रमाणीकरणच केलेले नसते. हेच सेंद्रिय प्रमाणीकरण करण्याची जबाबदारी स्वराज्य ॲग्रो कंपनीने उचलली आहे. स्वराज्य ॲग्रो कंपनी संपूर्ण नारळ आणि नारळाच्या झाडावर प्रक्रिया करणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना रत्नागिरीत सुरू करणार आहे. रत्नागिरीत नारळावरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मुबलक प्रमाणात नारळाची झाडे एकत्रित नाहीत. असलेली झाडे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे उत्पादन देत नाहीत. याकरिता कंपनीने रत्नागिरी शहरापासून ३५ किलोमीटर परिसरातील दोन लाख नारळाची झाडे शाकार व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नारळाची झाडे शाकार व्यवस्थापन सेवेला देणाऱ्या नारळ झाड मालकाची नारळाची झाडे असलेल्या जागेचे सेंद्रिय प्रमाणीकरण कंपनीमार्फत मोफत करून देण्यात येईल. बागेचे सेंद्रिय प्रमाणीकरण झाल्यामुळे त्या बागेत घेतले जाणारी आंबा, काजू, सुपारी, मसाल्याची पिके सेंद्रिय म्हणून विकता येऊ शकतात.
कंपनी शाकार व्यवस्थापन प्रणालीच्या खर्चामध्ये नारळ झाडमालकांना सहा वेळची पोषण द्रव्यांची मात्रा, भुंग्याचे औषधोपचार, प्रतिझाड एक हजार रुपयांचा सुरक्षा विमा, मोबाइल ॲप मोफत देणार आहे.
स्वतःच्या नारळाच्या झाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी, स्वतःचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्याच बरोबर कोकणात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रत्येक झाड मालकाने आपली सर्व नारळाची झाडे शाकार व्यवस्थापनासाठी कंपनीकडे द्यावीत, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. (२०१, श्रमसाफल्य, मनीषा टायपिंग सेंटर, दुसरा माळा, खालची आळी, रत्नागिरी) येथे संपर्क (क्र. ८०८०१८८२१८ किंवा ७५०७१२३१९५) साधावा.