
सलग चौथ्या वर्षी होणाऱ्या ‘सागर महोत्सवा’ची व्याप्ती वाढली
सलग चौथ्या वर्षी होणाऱ्या ‘सागर महोत्सवा’ची व्याप्ती वाढली आहे.सागर महोत्सव – समुद्रविश्व (सी युनिव्हर्स- सीव्हर्स) या नावाने हा महोत्सव साजरा होणार आहे. समुद्र आणि विश्व या संकल्पनेवर आधारित हे नाव सागराच्या अनंत विस्ताराचे आणि मानवी संवेदनांच्या संगमाचे प्रतीक आहे. त्यामुळे यात सागराचा विस्तार, सागरासारखा अनुभव नक्की मिळेल, असा विश्वास आयोजक आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक-संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी व्यक्त केला.
प्रतिवर्षी अधिकाधिक प्रगल्भ होत जाणारा ‘सागर महोत्सव’ आता राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळी गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जानेवारी २०२६ मध्ये ‘सागर महोत्सव- समुद्रविश्व’ या नावाने होणार असून यात केवळ व्याख्यानं, चित्रपट प्रदर्शन किंवा किनारा अभ्यासापुरतेच कार्यक्रम मर्यादित राहणार नाहीत, तर शैक्षणिक, पर्यावरणीय आणि अभ्यासात्मक पर्यटन या नव्या क्षेत्रांमध्ये कार्याची व्याप्ती वाढवली आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाने या उपक्रमाला मान्यता देऊन मदत जाहीर केली आहे.
पुणे आणि रत्नागिरी येथे जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज व रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘जबाबदार पर्यटन’ या पथनाट्याला पुणे महानगरपालिकेच्या वन्यजीव सप्ताह स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला. पथनाट्याची ही संहिता दिशा ठोसर यांनी लिहिली असून पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर घ्यायची काळजी प्रभावीपणे मांडली आहे.
‘सागर महोत्सवा’तील आणखी एक उपक्रम म्हणजे जंजिरा, अर्नाळा, खांदेरी, उंदेरी, कुलाबा आणि पद्मदुर्ग या सहा सागरी किल्ल्यांवरील वनस्पती आणि प्राणी जीवनाचा दोन ऋतूंतील अभ्यास, तसेच प्रथमच राज्यस्तरीय विद्यार्थी स्पर्धा आयोजित केली जात आहे, ज्यात महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळेल.




