
शासकीय कार्यालयांना निधी देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालाच लागली गळती
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या दुरुस्ती कामांची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला गळती लागली आहे. स्वत:च्या कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी वेळ नसल्याने प्लास्टिक कागद घालण्याची वेळ आली आहे. मुसळधार पावसामुळे कार्यकारी अभियंता (उत्तर रत्नागिरी) कार्यालयाला गळती लागली आहे. त्यामुळे त्यांना छपरावर प्लास्टिकचा कागद घालण्याची वेळ आली. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील सर्व शासकिय इमारतींचा ताबा आहे. त्यांच्या उभारणीसह दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असते. या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्वत:च्या कार्यालयाची ही अवस्था झाली असल्याने खंत व्यक्त केली जात आहे. संबंधित शासकीय कार्यालयाचा दुरुस्ती प्रस्ताव आल्यानंतर उपलब्ध निधीच्या आधारे त्या कार्यालयाची दुरुस्ती केली जाते.