पहिल्याच पावसात महामार्गावरील पर्यायी मार्ग उखडले चिपळूण तालुक्यातील वालोपे नजीकच्या रस्त्याची दुर्दशा

 
 

 ——————————–
 
खेड : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गांच्या कामाचा दर्जा  पहिल्याच पावसात उघड झाला आहे. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या दर्जेदार कामाची साक्ष देत आहेत. केवळ काही तास कोसळलेल्या पावसामुळे अर्धाधिक महामार्ग खड्ड्यात गेल्याने वाहन चालक आणि प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
 
पाऊस सुरु झाला कि महामार्ग खड्ड्यात जाणे हे काही या मार्गावरील वाहन चालक आणि प्रवाश्याना नवीन नाही. गेली अनेक वर्षे या खड्डेयमय रस्त्यावरूनच कोकणी माणूस प्रवास करत आहेत. खड्ड्यातून आदळत आपटत प्रवास करणे हे प्रवाशांच्या नशिबातच लिहिलेले आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच पहिल्याच पावसात रस्त्यावर एवढे खड्डे पडतील असे प्रवाशांना कधी वाटले नव्हते त्यामुळे पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांमधून आदळत आपटत प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशी आणि वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.
मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा ,महामार्गावरील जीवघेणे अपघत कमी व्हावेत या उद्देशाने हाती घेण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे चौपदरीकरणाचे काम सुरु आहेत मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. पहिल्याच पावसात झालेल्या रस्त्याची दुर्दशा पाहून ठेकेदार कंपनीने महामार्ग कामात कशाप्रकारे चुना लावला आहे हे स्पष्ट होते मात्र कामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणारे महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार कंपनीला काहीही बोलत नसल्याने कंपनीचे चांगलेच फावले आहे.
चौपदरीकरणाचे काम करताना ज्या ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग केले जातील ते मार्ग डांबराचे असावे असे निविदेत नमूद करण्यात आलेले आहे. ठेकेदार कंपनीने कामाची निविदा स्वीकारताना पर्यायी मार्ग डांबराचे करण्याचे मान्य देखील केले आहे मात्र त्याची अंमलबजावणी करताना केवळ पैसे वाचविण्यासाठी ठेकेदार कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचे पर्यायी मार्ग तयार केल्याने पावसात या मार्गांची दुरवस्था झाली आहे.
चिपळूण तालुक्याच्या हद्दीत जी ठेकेदार कंपनी काम करत आहेत त्या ठेकेदार कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. वाशिष्ठी पुलाचे काम झाल्यावर काही दिवसातच पुलावरील रस्त्यात टाकलेल्या लोखंडी शिगा बाहेर डोकावू लागल्या होत्या. आता बालोपे नजीकच्या रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात येत आहे त्यामुळे ठेकेदार कंपन्या कोकणात कशाप्रकारे कामाला चुना लावत आहेत हे स्पष्ट होत आहे.
 
२५ जून पासून कोकणात खऱ्या अर्थाने पाऊस सक्रिय झाला आणि पहिल्या पावसातच रस्त्याची अशी दुरवस्था होत असेल  तर संपूर्ण पावसात या रस्त्याची  अवस्था काय होईल याचा विचार देखील न केलेला बरा. महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी क्रॉंक्रीटीकरण झालेले नाहीत त्या त्या ठिकाणी रस्त्यावर असे खड्डे  पडले असल्याने वाहनचालकांनी वाहने कशी हाकायची हा प्रश्न पडला आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने खडडतात साचलेल्या पाण्यामुळे खड्डाची खोली कळत नसल्याने खड्ड्यात आदळून वाहने नादुरुस्त होण्याच्या  घटना घडत आहेत. महामार्ग  बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करून संबधीत ठेकेदार कंपनीला आवश्यक त्या सूचना कराव्यात  वाहनचालक आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा  देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button