
पाऊस पावला! रविवारपासून रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा
रत्नागिरी : जून महिन्यात लांबलेला पाऊस जूनच्या शेवटी जोरदार सक्रीय झाला आहे. यामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणार्या शीळ धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. 21 मे पासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. मात्र शीळ धरणात पाणीसाठा वाढू लागल्याने आता रविवार 26 जूनपासून रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. रत्नागिरी शहराला प्रतिदिन 20 ते 22 एमएलटी इतका पाणीपुरवठा करावा लागतो. पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर व नगर परिषदेचे पाणी अभियंता भोईर यांनी 21 मे पासून घेतला होता. त्यानुसार रत्नागिरीकरांना पाणी मिळत होते. मात्र ही समस्या आता दूर झाली आहे. रविवारपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. तशी माहिती नगर परिषदेच्या सुत्रांनी दिली.