
तरुण व्यवसायिकाच्या खुनाने देवगड तालुका हादरला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके(31) या युवकाच्या निर्घृण खुनाने देवगड तालुका हादरला आहे. ही घटना सोमवारी पहाटे 3.30 च्या सुमारास मुणगे मसवी रस्त्यावर घडली. धारदार शस्त्राने तरुणाच्या चेहॖयावर व डोक्यावर अंगावर वार करून प्रसादची त्याच्या गाडीतच हत्या करून मृतदेह गाडीत उलट्या अवस्थेत टाकून मारेकरी पसार झाले.जाताना प्रसाद याच्या गाडीची चावी व त्याचा मोबाईल मारेकॖऱ्यांनी सोबत नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनूसार, प्रसाद हा मिठबांव येथे महाई-सेवा केंद्र चालवित होता. तसेच तो भाड्याने फोर व्हीलर देण्याचा व्यवसायही करीत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तिचा फोन आला व त्यांनी सकाळी रूग्णाला घेवून कुडाळ येथे न्यायचे असल्याने तुझी गाडी घेवून ये असे सांगीतले. प्रसाद सोमवारी पहाटे 3 वा.सुमारासच उठून त्याची व्हेगनार कार घेवून भाडे नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. मात्र आपण कोणाचे भाडे घेतले आहे अथवा त्याबद्दलची पुर्ण माहिती त्यांनी घरात आई, वडील व पत्नीला दिली नसल्याने याबाबत उलगडा होवू शकला नाही. दरम्यान सोमवारी पहाटे 4 च्या.सुमारास मिठबावचे सरपंच भाई नरे यांना मसवी येथे व्हॅगनार गाडीचा अपघात झाला आहे असा फोन आल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत गाडी घेवून त्या ठिकाणी गेले. यावेळी मुणगे मसवी रस्त्यावर व्हॅगनार गाडी दरवाजा उघडलेल्या स्थितीत उभी असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यावर ही गाडी मिठबांव येथील तात्या लोके यांची असल्याचे लक्षात आले.गाडीमध्ये त्यांनी पाहिले असता प्रसाद लोके हा रक्तबंबाळ अवस्थेत दिसला.त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसल्यानंतर त्यांनी देवगड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.
देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.यावेळी त्याचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला. प्रसादच्या डोक्यावर, अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घुण खुन केल्याचे निदर्शनास आले.
www.konkantoday.com