रत्नागिरीत नवीन मीटर बसवल्याने पाणी बिले येणार दर तीन महिन्यांनी
रत्नागिरी : शहरात नवीन नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच नवीन मीटर जोडण्याचे काम घेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी मीटर जोडण्याचे काम सुरू झाले. शहरातील 10 हजार 288 नळजोडण्यांना नवीन मीटर (जलमापक) बसवण्यात येत आहेत. ज्या नळजोडण्यांना हे मीटर बसवण्यात आले आहेत, त्यांची पाणी बिले दर तीन महिन्यांनी दिली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे 6 हजार मीटर जोडण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. आयट्रॉन कंपनीचे हे मीटर असून, रत्नागिरी नगर परिषदेकडून ते मोफत जोडले जात आहेत. 1 जानेवारीपर्यंत ज्यांच्या जोडण्या निश्चित झाल्या आहेत, त्यांना मोफत मीटर मिळत आहेत. मात्र त्यानंतर नवीन नळजोडण्या घेणार्यांना हे जलमापक विकत आणावे लागत आहे. नवीन मीटर जोडल्यानंतर पूर्वीप्रमाणे एक महिन्याची पाणीबिल येईल असे नळधारकांना वाटत होते. परंतु मीटर रिडींग आणणे, त्यानुसार पाणी बिल बनविल्यानंतर ते नळधारकाच्या घरी नेऊन देणे हे काम करण्यात वेळ जात असल्याने नवीन मीटरधारकांना एकत्रितपणे तीन महिन्यांचे बिल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.