
चिपळुणात आलेल्या पुरांचा अभ्यास करून शासनाला देणार अहवाल
चिपळूण : चिपळुणात आलेल्या पुरांचा अभ्यास करावा. त्याच पद्धतीने या कालावधीतील सर्व आकडेवारीचा अहवाल शासनाला द्यावा. ज्यावेळी 400 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडेल त्यावेळी किती पाणी जमा होऊ शकेल आणि अशावेळी कोयजेचे अवजल सोडण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात? याबाबत शासनाला अभ्यासाअंती अहवाल देण्यात येईल, असे अभ्यासगटाच्या बैठकीमध्ये ठरले. पोफळी येथील महाजनकोच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीसाठी अभ्यास गट समितीचे अध्यक्ष अभियंता दीपक मोडक, महाजनकोचे मुख्य अभियंता संजय चोपडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. शरद जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पोतदार, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, निमंत्रित सदस्य सतीश कदम, किशोर रेडीज आदी समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 1965, 1989, 1992, 2005 आणि 2021 मध्ये चिपळुणात आलेल्या महापुराच्यावेळी पाऊस किती पडला, कोयनेतून पाणी कसे सोडले, 1965 पासून शहराचा झालेला विस्तार, नद्यांची पाणी वहन क्षमता, पर्जन्यवृष्टी अशा सर्व स्तरातून आकडेवारी गोळा केली जाणार आहे व त्याचा अभ्यास समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. अभ्यास गटाची पुढील बैठक 12 जुलैच्या सुमारास होणार आहे आणि या नंतरच शासनाला अहवाल देण्यात येईल.