आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात कामचुकारपणा नको : चिपळूणच्या प्रांताधिकार्यांचा इशारा
चिपळूण : मागील आठवड्यात कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्याची माहिती थेट जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात देण्यात आली. तहसीलदार अथवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ही माहिती मिळालीच नाही. ही बाब गंभीर असून यापुढे आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात कामचुकारपणा चालणार नाही, असा इशारा चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तालुक्यातील अधिकारी, कर्मचार्यांना दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी दि. 22 रोजी झाली. या बैठकीला तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी उमा घाडगे-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी, निवारा केंद्रे, महावितरण आदींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. खेर्डी, मिरजोळी आणि कळंबस्ते या गावांत आपत्तीच्या वेळी लोकांना अॅलर्ट करण्यासाठी त्वरित भोंगे बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या. आपत्तीविषयक घडामोडींची माहिती तहसीलदार, तालुका आपत्ती नियंत्रण कक्षाला कळवलीच पाहिजे, यात कामचुकारपणा चालणार नाही, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.