
राजापुरात स्थलांतराच्या नोटिसा मिळाल्या, पण भूखंड मिळेनात
राजापूर : पावसाळ्यात राजापूर शहरात भरणार्या पुराचा धोका लक्षात घेता तहसील प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, पूरग्रस्त असतानाही अद्याप पर्यायी भूखंड मिळाला नसल्याने स्थलांतरीत कोठे व्हायचे, असा सवाल भूखंडापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांकडून करण्यात आला आहे.
राजापूर शहराला दरवर्षी पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे बाजारपेठेतील रहिवासी व व्यापार्यांचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन शासनाने पुररेषा निश्चित करून पूररेषेतील नागरिकांचे साईनगर भागात पुनर्वसन केले आहे. पावसाळ्यात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूररेषेतील नागरिकांना पर्यायी जागेत स्थलांतरित होण्याच्या नोटीसा पशासनाकडून बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही शहरातील काही पूरग्रस्तांना यादीत नाव असतानाही पुनर्वसन वसाहतीत भूखंड मिळालेला नाही. मग आम्ही पावसाळ्यात धोकादायक स्थितीत कोठे स्थलांतर करायचे? असा सवाल भूखंडापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांतून करण्यात येत आहे.