सावधान! मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय झाल्याने अपघात
चिपळूण : ऐन पावसाळ्यात रस्त्यावर मातीचा भराव टाकल्यामुळे चिपळूण शहरातील शिवाजीनगर ते डीबीजे महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चिखलमय झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना काळजी न घेतल्याने ही समस्या उद्भवली आहे. यामुळे अपघात होत आहेत. येथे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. चिखलमय रस्त्यावर मंगळवारी दुपारी चार दुचाकी घसरल्या. त्यामध्ये तीन दुचाकी महाविद्यालयीन युवकांच्या होत्या.
ऐन पावसाळ्यात मातीचा भराव टाकून काम सुरू करण्यात आल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भरावाची माती दोन्ही बाजूने सुमारे अडीच कि.मी. पर्यंत वाहून रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम गेली सहा महिने सुरू आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून आपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. मातीचा भराव टाकल्यानंतर पावसाळ्यात चिखल होणार आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वीच व्हायला हवी होती; मात्र गेली सहा महिने कोणतेही प्रय़त्न झाले नाहीत.