
राजापूर आगारात तब्बल 23 एसटी बस टायरअभावी उभ्याच
राजापूर : प्रथम कोरोनाचे संकट आणि त्यानंतर एसटीचा संप यातून कुठे एसटी सेवा पूर्वपदावर येत असताना टायरच्या तुटवड्यामुळे राजापूर आगारात अनेक एसटी बस उभ्या असून, त्याचा परिणाम नियमित फेर्यांवर झाला आहे. ऐन गर्दीच्या हंगामात राजापूर आगाराचे वेळापत्रक कोलडमडले आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. टायर उपलब्ध होत नसल्याने राजापूर आगारात तब्बल 23 एसटी बस उभ्या आहेत. आता सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनानंतर जनजीवनही पूर्ववत सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एसटीला पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे. अशातच हे टायर तुटवड्याचे संकट आल्याने राजापूर एसटी आगारातील 23 बसेस उभ्या आहेत. या गाड्यांना आवश्यक असणारे पुढील व मागील टायरच वरिष्ठ कार्यालयातून उपलब्ध होत नसल्याने ज्या गाड्या सुस्थितीत आहेत त्यावरच दैनंदिन वेळापत्रक चालवावे लागत आहे.