डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचणे आवश्यक : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथांचे प्रकाशन
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर विचारवंत होते. त्यांचे विचार जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले. मंगळवारी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या एकूण सहा ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, ग्रंथांचे अनुवादक आर.के. क्षीरसागर, आनंदराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. प्रकाश बच्छाव, डॉ. सुरेंद्र धातोडे, प्राध्यापिका सुषमा अंधारे, योगीराज बागुल, सिध्दार्थ खरात, कमलाकर पायस, डॉ. संभाजी बिरांजे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ऑडीओ, व्हिडीओच्या माध्यमातून डिजीटल स्वरुपात देखील ग्रंथ प्रदर्शित केले जावेत. चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन झाल्यापासून गेल्या 48 वर्षांमध्ये प्रथमच एकाच वेळी सहा ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येत आहे ही फार अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून त्यांनी सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.
राज्याचे ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये मंत्री उदय सामंत हे प्रकाशन समितीचे कार्य सकारात्मक पध्दतीने आणि उत्तमरित्या करीत आहेत असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि आज याच रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या साहित्य प्रकाशनाचा सोहळा संपन्न होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे डॉ. राऊत यावेळी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुतांशी साहित्य इंग्रजी भाषेमध्ये आहे त्याचा अनुवाद करण्याचे काम समितीने हाती घेतले असून यामुळे हे साहित्य सर्वसामान्यांना समजणे सोपे होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे निर्माते आहेत. आंबेडकरी विचारांचा प्रकाश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविला पाहिजे अशा शब्दात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जनता’ पाक्षिक ‘1930 ते 1956 पर्यंत प्रकाशित झालेल्या ‘जनता’चा दुसरा खंड आणि इंग्रजी खंड 13 चा मराठी अनुवाद. ‘डॉ. आंबेडकर: भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार’ – भाग -1 आणि भाग-2 या नवीन ग्रंथाचे प्रकाशन. इंग्रजी 13 व्या खंडाचा अनुवाद सोअर्स मटेरियल चा खंड -1. डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे-खंड-8. खंड-10. खंड -13 या 4 इंग्रजी खंडाच्या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भिम गीते व निवडक महाराष्ट्र गीते सादर करण्यात आली.