
खोपी येथील डुबी नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले
खेड : तालुक्यातील खोपी कुंभाडसह जावळीच्या खोर्यातील वीस-पंचवीस गावांना जोडणार्या डुबी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर झाला. ठेकेदार नेमण्यात आला व त्याला कार्यादेश देखील देण्यात आला. मात्र तरी देखील पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम झाले नाही. काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांवर स्थलांतराची टांगती तलवार कायम असल्याने नाराजी आहे. खोपी ग्रामस्थांमध्ये गतवर्षीपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील ब्रिटीशकालीन पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये ठेकेदाराला कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटूनही ठेकेदाराने पुलाच्या बांधकामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची दखल घेऊन खोपी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची पुलाअभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.