
मुलीची सोशल मीडियावर बदनामी करणार्याला पोलिस कोठडी
दापोली : शहरातील एका अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यास नकार दिल्याने समाज माध्यमांवर या मुलीसंदर्भात अश्लील मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी अनिकेत ढेपे पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 2 जानेवारी ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत अनिकेत ढेपे पाटील (वय 24) याने 17 वर्षे 5 महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी सांगितले. मात्र या मुलीने त्यास नकार दिल्याने अनिकेत याने समाज माध्यमावर या मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला. यामुळे बदनामी झालेल्या या मुलीने अखेर दापोली पोलिस ठाण्यात अनिकेत ढेपे पाटील याच्या विरोधात तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अहिरे करत आहेत.