कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या कोल्हापूरच्या दोघांना निवळी येथे अटक
रत्नागिरी : जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून 5 जनावरे व वापरण्यात आलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. हंसराज विलास चांदणे (वय 29, राहणार मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि रामचंद्र साधु सोने (वय 40, राहणार आरुळ, शाहूवाडी, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे दोघेही महिंद्रा पिकअप (एम.एच.-11ए.जी. 9310) मधून गुरे घेऊन निघाले असताना निवळी येथील ग्रीन पार्क हॉटेलच्या वळणावर ही कारवाई केली. जनावरे व महिंद्रा गाडी असा एकूण 4 लाख 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर प्रकाश कदम (वय 31, रा. कदमवाडी, हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.