शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस काका व पोलिस दिदीनी केले मार्गदर्शन
विद्यार्थीनींची छेडछाड रोखण्यासाठी रॅगिंग किंवा अंमली पदार्थाच्या आहारी जाणाऱ्या मुलांना रोखण्यासाठी तसेच मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस काका आणि पोलीस दिदीची नेमणूक करण्यात आली आहे.या पोलीस काका आणि पोलीस दिदीचे मोबाईल आणि नंबर त्या परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयामध्ये लावण्यात आले आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर पोलीस काका आणि पोलीस दिदीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कम्युनिटी पोलिसींग योजनेतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस काका आणि पोलीस दिदी हा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक पुरुष पोलीस अंमलदारांची पोलीस काका म्हणून आणि महिला पोलीस अंमलदाराची पोलीस दिदी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
विद्यार्थीनींची छेडछाड, रॅगींग, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे या सर्व प्रकारच्या घटना आज समाजामध्ये घडतात. अशावेळी वेळीच मदत मिळाल्यास भविष्यात होणारी हानी थांबवून प्रतिबंध होण्यास मदत होते. शाळेमधील लहान मुले, महाविद्यालयीन युवक युवती यांच्या समस्याचे निराकरण आणि सुरक्षेसाठी तसेच शाळेत न जाणारी बालके, रस्त्यावर फिरणारी एकटी दुकटी मुले यांच्या सुरक्षा आणि समस्यांसाठी मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे पोलीस काका आणि पोलीस दिदीची नेमणूक करण्यात आली आहे.
हे पोलीस काका आणि पोलीस दिदी सर्व महाविद्यालये आणि शाळांना भेटी देतात. त्यांनी मुलांचे वॉटसअपचे ग्रुपही तयार केले आहे. त्याद्वारे ते मुलांशी संवाद साधतात. 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच शाळा सुरू झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस काका आणि पोलीस दिदींनी 24 शाळा आणि महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये 1,504 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमातून सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, पोस्को कायदा माहिती ऑनलाईन फसवणूक, महिलांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. किशोरवयीन मुलींना गुडटच बॅडटच विषयी माहिती देण्यात आली.