
पाणी पिताना ठसका लागून घुसमटल्याने गिम्हवणे येथील एकाचा मृत्यू.
पाणी पीत असताना ठसका लागून दापोली गिम्हवणे येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसूद येथे घडली आहे. दापोली पोलीस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम गणू कांगणे हे त्यांच्या ४ सहकाऱ्यांसह शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आसूद येथे एका जागेच्या साफसफाईच्या कामाला गेले होते.
सकाळी साडेदहा वाजण्याच्या आसपास पाणी पिण्यासाठी काम थांबवले होते. कांगणे यांच्यासोबत कामाला गेलेले संजय विठ्ठल दुबळे, रा. गिम्हवणे हे पाणी पित असताना अचानक त्यांना ठसका लागला. त्यानंतर त्यांना २ ते ३ वेळा उचकी लागली व थोड्या वेळाने त्यांनी तेथेच मान टाकली. त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.