खेड तालुक्यातील तीन गावे दरड प्रवरण क्षेत्रात दरडग्रस्त वाड्यांचे पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांवर भीतीची टांगती तलवार


 
खेड :खेड तालुक्यात दरड प्रवरण क्षेत्रात येणाऱ्या शेल्डी , पोसरे आणि बिरमणी या तीन गावातील धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन न झाल्याने या गावातील सुमारे २०० कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. पावसाळ्यापूर्वी या गावातील ग्रामस्थांचे स्थलांतर होणे गरजेचे होते मात्र या तिन्ही वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा हवेत विरल्याने पाऊस सुरु होताच येथील ग्रामस्थांची घालमेल सुरु झाली आहे. दुर्देवाने रात्री अपरात्री दरड कोसळली तर आम्ही करायचे काय? असा सवाल या गावातील ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
 
गतवर्षी २२ जुलै हा दिवस कोकणवासीयांसाठी काळ दिवस ठरला. या दिवशी झालेल्या अतिवृष्टीत खेड तालुक्यातील  पोसरे बौद्धवाडीवर दरड कोसळून तब्बल १० घरे मातीच्या डिगाऱ्याखाली गाडली गेली. झोपेत असतानाच ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घनेत १७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ जुलै रोजी तालुक्यातील बिरमणी येथे आणखी एका घरावर दरड कोसळली आणि त्यात पति-पत्नी दोघांचाही बळी गेला. खेड तालुक्यात पोसरे येथे दरड कोसळून झालेली ही दुर्घटना मनाचा थरकाप उडवणारी होती. दुर्घटनेनंतर सुमारे १५ दिवस बौद्धवाडीवर कोसळेला डोंगर हटविण्याचे काम सुरु होते. दरड काढताना जमिनीखाली गाडले गेलेले मृत्यदेह बाहेर काढताना मदतकार्य करणाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण होत होते.
अतिवृष्टीमुळे कोकणात झालेली पडझड, दरड दुर्घटनेत गेलेले बळी, अन्य अनुकसान याची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे खेड येथे आले असता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दरड प्रवरणक्षेत्रात येणारी गावे आणि वाड्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक वाड्यांचे अन्यत्र पुनर्वसन केले जाईल अशी घोषणा केली होती. वडेट्टीवार यांच्या घोषणेनुसार खेड तालुक्यातील दरड प्रवरण गाव वाड्यांचे सर्वेक्षण देखील करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान  तालुकयातील शेल्डी  बिरमणी आणि पोसरे ही गावे धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या गावातील ग्रामस्थांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे होते मात्र पावसाळा सुरु झाला तरी या तिन्ही गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी  केलेली घोषणा हवेत विरली गेली आहे.
ज्या गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे त्या गावातील ग्रामस्थ सुरक्षितस्थळी पुनर्वसन व्हावे या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्याचे दिवस कसेतरी गेले मात्र पावसाळा सुरु होताच या गावातील ग्रामस्थांची घालमेल सुरु झाली आहे. अतिवृष्टीतला सुरवात झाली की घराच्या बाजूला असलेली टेकडी कधी काळ बनून खाली येईल आणि क्षणात सारे काही संपवून टाकेल याची शास्वती नसल्याने दरड प्रवरण क्षेत्रातील ग्रामस्थ आतापासूनच देवाचा धावा करू लागले आहेत. पावसाळ्यात दरड प्रवरण क्षेत्रात येणाऱ्या गाव-वाड्यांना असलेल्या धोका वाढणार असल्याने पुनर्वसन जेव्हा करायचे तेव्हा करा मात्र आता तात्पुरते स्थलांतर तरी करा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
तालुक्यात पुन्हा दरड कोसळून पोसरे बौद्धवाडी दुर्घटनेची  पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने ग्रामस्थांनी मागणी गांभीर्याने घेऊनदरड प्रवरण क्षेत्रातील कुटुंबाचे तात्काळ सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर करणे गरजेचे आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button