कुवारबाव येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याची सुटका
रत्नागिरी : शहरातील कुवारबाव येथील अॅक्सेस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताला त्याने दोन महिने दोन दिवस कोठडीत काढलेली शिक्षा ग्राह्य धरून आरोपीचे वय कमी असल्याने आणि पहिलाच गुन्हा असल्याने सुटका केली. या संशयिताचे नाव आसिफ उस्मान डांगे (19, बत्तीसशिराळा सांगली) असे आहे. कुवारबाव येथे अॅक्सेस बँकेच्या एटीएम फोडण्याची घटना 15 एप्रिल रोजी घडली होती. अटक केल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीमध्येच होता. शुक्रवारी याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने परिविक्षाधीन गुन्हेगारी कायदा 1958 च्या तरतुदीनुसार गुन्हेगाराचे कमी वय आणि त्याचा पहिलाच गुन्हा असल्याने, अटक केल्यापासून त्याने न्यायालयीन कोठडीत काढलेला कालावधी हीच शिक्षा ग्राह्य मानत त्याची तुरुंगातून सुटका केली.