सावधान! कोकण रेल्वेच्या अंजणी रेल्वे स्थानकात होताहेत लाखोंच्या चोर्या
खेड : कोकण रेल्वे मार्गावरून दि.20 व 22 मे रोजी धावणार्या गाड्यांमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवाशांच्या तब्बल 4 लाख 74 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, रजनी राजू कोटीयन (68, रा. खार, पूर्व मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात नमूद केल्यानुसार, ते कोचुवेली- एलटीटी एक्स्प्रेसमधून दि. 20 मे 2022 रोजी प्रवास करीत होते. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास खेडमधील रेल्वे अंजणी रेल्वेस्थानकावर थांबली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरली. त्यामध्ये 4 हजार रू. किमतीची शोल्ड पर्स, 3 लाख 28 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, 15 हजार रू. किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण 3 लाख 43 हजार 400रूपयांचा ऐवज त्याने चोरून नेला.
कोकण रेल्वे मार्गावर अंजणी रेल्वे स्थानकातच दि. 22 मे 2022 रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने आणखी एक चोरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर गोविंद वंजारे (36, रा.मालाड पूर्व) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणार्या कोचुवली एलटीटी एक्सप्रेसमधून ती दि.22 मे 2022 रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत असताना अंजणी रेल्वेस्थानकात गाडी थांबली. अज्ञात चोराने त्यांची पर्स चोरून नेली. त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कानातील रिंग असा एकूण 1 लाख 31 हजार 500 रू. किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.