रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढतेय
रत्नागिरी : यंदा रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळांची पटसंख्या तीनपटीने वाढली आहे. येथील नगर परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी वाट पाहण्याची वेळ पालकांवर आली आहे. खासगी शाळा आणि इंग्लिश मीडियमकडे पालक व विद्यार्थी यांचा कल वाढत असताना हा बदल कौतुकास्पद ठरत आहे. खासगी शाळांना विद्यार्थी मिळत नसताना नगर परिषदेच्या शाळा मात्र फुल्ल झाल्या आहेत.
दामले विद्यालयासारख्या शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढवला आहे. येथील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत झळकत आहेत. शाळेचा चेहरा-मोहरा बदलण्यात आला आहे. विविध उपक्रम राबवण्यात येतात. इतर नगर परिषद शाळांनीही आपला शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांत प्रयत्न केले. त्यामुळे शाळांच्या शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. शहरातील सर्व नगर परिषदेच्या शाळांची पटसंख्या फुल्ल झाली आहे. दामले विद्यालयात तर प्रवेश बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.