*शाळकरी मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या**आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी, 50 हजाराचा दंड**चिपळूण विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी सुनावली शिक्षा*

*रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी अजित देवजी गोरीवले (वय सुमारे ४० वर्षे रा. उमराठ गोरीवलेवाडी, ता. गुहागर) यास चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी वीस वर्षे सक्तमजुरीची व 50 हजार रू. दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी अजित देवजी गोरीवले याने 6 मे 2018 रोजी रात्रौ सुमारे 10 च्या सुमारास मुंबईवरून पाहुणी म्हणून गावी आलेल्या व स्वतःच्या मुलीप्रमाणे असलेल्या 15 वर्षाच्या शाळकरी मुलीला गोंधळाचा कार्यक्रम दाखविण्यासाठी घेवून जाण्याचा बहाणा केला. त्यानंतर तिला मोटारसायकल वरून मौजे उमराठ येथील नवलाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस नेवून बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी धाडसाने तिच्या आईला घटनेबाबत सर्व हकिकत सांगितली. पीडितेच्या आईने थेट गुहागर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरूध्द रितसर तक्रार दिली. या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी करून तपासाअंती आरोपीविरूध्द भा.दं.वि.कलम ३७६,३२३,५०६ अन्वये तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाचे कलम ४,६,८,१० अन्वये चिपळूण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांच्यापुढे पूर्ण झाली. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॕड अनुपमा ठाकूर यांनी ९ साक्षीदार तपासले. आरोपीने बचावासाठी १ साक्षीदार तपासला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी आज आरोपीस भारतीय दंड संहिता कलम ३७६(३),३२३,५०६ अन्वये तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ६ अन्वये दोषी ठरवून भा.द.वि कलम ३७६ (३) व पोक्सो ४ व ६ प्रमाणे आरोपी अजित देवजी गोरीवलेस २० वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. नुकसान भरपाईची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने केला. आरोपीला दिलेल्या शिक्षेमुळे महिला व शाळकरी मुलींवर वाढलेल्या लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसेल. तसेच या शिक्षेमुळे पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अॕड ठाकूर यांनी व्यक्त केली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॕड ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांना खटल्याच्या कामी कोर्ट पैरवी प्रदीप भंडारी यांनी सहकार्य केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button