तलवार हल्ला प्रकरणी दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ; संशयितांना घरात आश्रय देणाऱ्याला न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी : शहरातील क्रांतीनगर येथे काही दिवसांपूर्वी तरुणावर तलवार हल्ला करण्यात आला. यातील दोघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने शुक्रवारी 5 दिवसांची वाढ केली. तसेच संशयितांना घरी आश्रय देणाऱ्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. राजेंद्र शिवाजी विटकर (वय 28, राहणार क्रांतीनगर, रत्नागिरी) या तरुणावर धारदार तलवारीने वार करण्यात आले होते. गुरुनाथ प्रताप नाचणकर (वय 26, रा. मिरजोळे, रत्नागिरी), सुशिल सुनिल रहाटे (वय 33, रा.लक्ष्मी नगर कोळंबे, रत्नागिरी) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर सौरभ अर्जुन सावंत (वय 32, रा. सुपलवाडी नाचणे, रत्नागिरी) याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 6 जून रोजी दुपारी राजेंद्रचा गुरुनाथ नाचणकर आणि सुशिल रहाटेशी वाद झाला होता. या रागातून रात्री 8.20 वा. या दोघांनी राजेंद्रवर तलवारीने वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी न्यायालयाने या तिघांनाही 17 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करून एकाला न्यायालयीन कोठडी सुनावली.