जिल्ह्यात मान्सूनपूर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण; 821 ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड
रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वीची पाणी स्रोतांची तपासणी करण्यात आली. या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये 821 ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड, चार ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. विशेष म्हणजे 2012 पासून अद्याप एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. ही बाब जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचाच आधार घेत गुणवत्ता स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे वर्षातून दोनदा स्वच्छता सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात येते.
स्रोतांचे परिसर व व्यवस्थापनातील काही दोष आढळून येतात. त्यांचे निराकरण करून संभाव्य साथीस प्रतिबंध करता येतो. हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सर्वेक्षण असून, या सर्वेक्षणाद्वारे ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे, लाल आणि चंदेरी कार्ड वितरित करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी (मार्च ते मे) व पावसानंतर (ऑक्टोबर ते डिसेंबर) असे दोनदा जिल्ह्यातील पाणी स्रोतांची तपासणी होते.