
खरंच की काय?…राजापूरची गंगा आली की पाऊस लांबतो…
राजापूर : गंगा आली की पाऊस लांबतो, असे गंगा आगमनानंतर सर्रासपणे बोलले जाते. त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या मागील कारणे विविध असली तरी लांबलेल्या पावसाचा संबंध गंगेशी नेहमीप्रमाणे जोडला जातोच. गंगा आली की पाऊस लांबतो, असे स्थानिक जाणकार आणि वयोवृध्द लोकांकडून हमखास ऐकायला मिळते. मे महिन्यात येथील गंगेचे आगमन झाले आणि पावसावर त्याचा परिणाम होणार, अशा नेहमीच्या चर्चा आताही सुरू आहेत. आता त्याची प्रचिती येऊ लागली आहे. अर्धा जून संपला तरी पावसाचा रुसवा न संपल्याने गंगा आगमनाने पावसावर परिणाम झाला की काय? अशा शंकांना पुष्टी मिळत आहे. मे महिन्यात राजापूरच्या गंगामाईचे आगमन झाले आहे. मूळ गंगेसह सर्व कुंडात चांगल्यापैकी पाणी आहे. गोमुखातून अविरत धार सुरू आहे. गंगाक्षेत्रावर अजूनही भाविक स्नानासाठी येत आहेत. उन्हाळ्याप्रमाणेच दररोज कडाक्याचे उन पहावयास मिळत आहे. एखाद्यावेळी पावसाची हलकी सर पडते. मात्र बाकी तालुक्यात त्याचे प्रमाण फारच कमी आहे.